नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटाने राजधानी हादरल आहे. हा दहशतवादी कट असल्याचे सरकारने म्हटले आहे. तपास यंत्रणांच्या म्हणणन्यानुसार, हे दहशतवादी केवळ दिल्लीपुरतेच मर्यादित नव्हते, तर देशातील इतर मोठ्या शहरांतही साखळी स्फोट घडविण्याचा त्यांचा इरादा होता. आठ दहशतवादी चार प्रमुख शहरांमध्ये ब्लास्ट करणार होते. दोन-दोन जणांच्या गटाने वेगवेगळ्या शहरांत आयईडी ब्लास करण्याचा त्यांचा कट होता.
डॉ. मुजम्मिल, डॉ. अदील, उमर आणि डॉ. शाहीन या चौघांनी मिळून सुमारे 20 लाख रुपये जमा केले होते. हे पैसे दिल्ली स्फोटापूर्वी उमरकडे देण्यात आले होते. मात्र, याच पैशांवरून उमर आणि डॉ. मुजम्मिल यांच्यात वाद निर्माण झाला. यानंतर उमरने सिग्नल ॲपवर दोन ते चार सदस्यांचा स्वतंत्र ग्रूप तयार केला. या गटाने गुरुग्राम, नूह आणि आसपासच्या परिसरातून तब्बल 20 क्विंटल एनपीके खत खरेदी केले होते, याची किंमत सुमारे तीन लाख रुपये होती, असेही तपासात उघड झाले आहे.
तपासातून समोर आले आहे की, दिल्लीतील आय-20 आणि इकोस्पोर्टसारख्या जुन्या गाड्यांनंतर, हे दहशतवादी आणखी दोन अशाच गाड्या तयार करण्याच्या तयारीत होते. या कारमध्ये स्फोटके भरून मोठा स्फोट घडविण्याचा हेतू होता. या वाहनांचा वापर ब्लास्टसाठीच केला जाणार होता का? यासंदर्भात यंत्रणा शोध घेत आहेत.
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात किमान 10 जण ठार तर अनेक जखमी झाले आहेत. प्राथमिक तपासात हे जैश-ए-मोहम्मदच्या नव्या मॉड्यूलने केल्याचा संशय आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आता एसपी दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष टीम स्थापन करून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.